Ad will apear here
Next
भगवद्गीतेच्या योग्यतेचा ग्रंथ - अष्टावक्र गीता
अष्टावक्र गीता हा भगवद्गीतेसारखाच महत्त्वाचा ग्रंथ आहे. राजा जनक आणि अष्टावक्र ऋषी यांच्यात झालेल्या संवादाच्या द्वारे अद्वैत तत्त्वज्ञान अर्थात आत्मज्ञानाचे विवेचन त्यात केलेले आहे. अष्टावक्र गीता हा ज्ञानयोग आहे. ‘किमया’ सदरात ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर आज करून देत आहेत अष्टावक्र गीतेची ओळख... 
...........
अष्टावक्र गीता हा भगवद्गीतेसारखाच महत्त्वाचा ग्रंथ आहे. राजा जनक आणि अष्टावक्र ऋषी यांच्यात झालेल्या संवादाच्या द्वारे अद्वैत तत्त्वज्ञान अर्थात आत्मज्ञानाचे विवेचन त्यात केलेले आहे.  ‘मी कोण? आलो कुठून आणि जाणार कुठे?’ या प्रश्नांचा शोध जिज्ञासू, मुमुक्षु लोक सतत घेत असतात. तो घेताना साहजिकच वैराग्य आणि ज्ञान कसे प्राप्त होते, तसेच जन्ममरणाच्या चक्रातून मुक्ती कशी मिळते, हे स्पष्ट होत जाते. राजा जनक स्वत: ज्ञानी आहेच. परंतु वेदान्ताची पुन्हा उजळणी करण्यासाठी आणि लोकांना तो विषय सोप्या शब्दांत कळावा, या सद्हेतूने अष्टावक्र ऋषींना तो प्रश्न  विचारतो. ऋषिवर त्याची समर्पक उत्तरे देऊन राजाचे समाधान करतात. वरकरणी अवघड वाटणारे हे ज्ञान प्रत्यक्षात अगदी सुलभ आहे. बाहेरच्या जगाशी आपल्याला काही देणे-घेणे नाही. बाहेर काही नाहीच! ‘अगा जे घडलेचि नाही, त्याची वार्ता पुसशी काई!’ फक्त स्वत:ला जाणणे! जीव आणि शिव, आत्मा आणि परमात्मा एकच! आहे की नाही सोपे? अष्टावक्र गीता हा ज्ञानयोग आहे.

महाभारतामधील वनपर्वात, तीर्थयात्रा प्रकरणाच्या १३२व्या अध्यायात वैशंपायन ऋषी जन्मेजयाला अष्टावक्रांची जन्मकथा सांगतात. महर्षी उद्दालकांचा पुत्र श्वेतकेतू आणि कहोड नावाचा एक प्रिय शिष्य होता. श्वेतकेतू मंत्रशास्त्राचा फार मोठा जाणकार होता. कहोड आपल्या गुरूंच्या सेवेत सदैव तत्पर असे. त्यामुळे प्रसन्न होऊन उद्दालकांनी कहोडला वेदशास्त्रांचे संपूर्ण ज्ञान प्रदान केले. एवढेच नाही, तर आपली कन्या सुजाता हिचा कहोडबरोबर विवाह लावून दिला. काही काळाने सुजाता गर्भवती झाली.

एकदा पिता कोहड स्वाध्याय करत असताना, आईच्या गर्भातील बालक त्यांना म्हणते की, ‘पिताजी, आपण दिवसरात्र वेदपठण करत असल्यामुळे (थकवा येऊन) श्लोकांचे शुद्ध उच्चारण होत नाही.’ कहोड अन्य शिष्यांसमवेत बसले होते. अद्याप जन्मही न झालेल्या पुत्राने केलेल्या त्या विधानामुळे अपमानित होऊन त्यांनी गर्भस्थ बालकाला शाप दिला, ‘आईच्या पोटात असताना तू असे वेडेवाकडे बोलण्याचे धाडस करतोस, तर तुझा देह आठ ठिकाणी वाकडा होईल!’ त्या शापानुसार मुलगा आठ जागी वाकडा असलेल्या देहाने जन्माला आला. म्हणून ‘अष्टावक्र’ नावाने तो ओळखला जाऊ लागला. (दुसरी एक कथाही प्रसिद्ध आहे. गर्भातील बाळाने चूक दाखवल्याने कृद्ध होऊन कहोड यांनी आपल्या पत्नीच्या पोटावर लाथ मारली. त्यामुळे आतील बालक आठ ठिकाणी वाकडे झाले.) कुशाग्र बुद्धीमुळे बाराव्या वर्षीच, आजोबांच्या मार्गदर्शनाने, त्याने सर्व वेदशास्त्रे आत्मसात केली.

असेच एकदा कहोड जनक राजाच्या दरबारात गेले. तिथे चाललेल्या शास्त्रचर्चेत त्यांचा पराभव झाला. हरलेल्या विद्वानांना पाण्यात बुडवण्याची (विचित्र) शिक्षा देत असत. या घटनेनंतरच अष्टावक्र यांचा जन्म झाला. तो आपल्या मामाला भाऊ आणि आजोबांना वडील समजत असे. खरे वडील वेगळेच होते, हे समजल्यावर त्याने आईला त्याबाबत विचारले. तिनेही सर्व खरी हकीकत सांगितली. एव्हाना त्याचा वेदाभ्यास झालेला होता.

मामा श्वेतकेतूला बरोबर घेऊन तो जनकाच्या दरबारात गेला. तिथे द्वारपालांनी त्याला अडवले आणि ‘लहान मुलांना आत प्रवेश नाही,’ असे सांगितले. अष्टावक्र म्हणाला, ‘केस पांढरे झाले किंवा वय वाढले म्हणजे कोणी मोठे बनत नाही. ज्याची बुद्धी, प्रज्ञा श्रेष्ठ तोच खरा ज्ञानी!’ आणि तो दरबाराच्या आत शिरला. कहोड यांना ज्याने हरवले त्याला शास्त्रचर्चेसाठी त्याने आव्हान दिले. त्याचा आठ ठिकाणी वाकलेला देह पाहून दरबारी लोक हसू लागले. त्यावर अष्टावक्र शांतपणे म्हणाला, ‘अरे राजा, हे सगळे लोक देहाला आणि त्यावरच्या चामड्याला महत्त्व देतात. त्यांना काय म्हणावे?’ ते ऐकून राजा चपापला. त्याने अष्टावक्र यांची ओळख करून घेतली. त्याला काही कूटप्रश्नदेखील विचारले. त्या सर्वांची कुमार अष्टावक्र याने समाधानकारक उत्तरे दिली. त्यानंतर शास्त्रचर्चेला संमती मिळाली. त्यात कहोडना हरवणारा पराभूत झाला. अष्टावक्र जनक राजाला म्हणाला की, ‘आता हा हरल्यामुळे त्याला पाण्यात बुडवा.’ त्यावर ती व्यक्ती म्हणाली, ‘राजन्, मी वरुणाचा पुत्र आहे. हरलेल्या सर्वांना मी माझ्या वडिलांकडे पाठवले आहे. त्यांना आता परत आणतो.’ अशा रीतीने कहोड सुखरूप परत आले. 

अष्टावक्राने पित्याच्या पायांवर डोके ठेवले. पिताजी प्रसन्न झाले आणि त्यांनी पुत्राला जवळच्या एका नदीत स्नान करून यायला सांगितले. तसे केल्यावर अष्टावक्राचा देह सरळ झाला आणि तो अधिकच तेज:पुंज दिसू लागला.

राजा जनकाने अष्टावक्र यांचा गुरू म्हणून स्वीकार केला. ज्ञानी माणूस हा सर्वज्ञ नसतो. त्याला ‘आत्म’विषयक ‘बोध’ झालेला असतो; परंतु अध्यात्मातील काही शंका शिल्लक असतातच. राजाने त्या सर्व अष्टावक्र यांना विचारल्या. त्यांच्यात झालेला संवाद म्हणजेच ‘अष्टावक्र गीता.’ आत्मा, बंध (अज्ञान) आणि मोक्ष (अद्वैताचे ज्ञान) हे त्याचे प्रमुख विषय आहेत. बाह्य जगत हे पूर्णपणे भ्रामक असून, आपण (पिंड) आणि परमात्मा (ब्रह्म) एकरूपच आहे. तिथे नैतिकता किंवा कर्तव्याचा भागच नसतो. नामरूपाला अस्तित्वच नसून, तसे भासणे हेच अज्ञान आहे. ज्ञानी पुरुष फक्त ‘स्व’ला बघतो. देव-देवतांना तिथे स्थान नाही. ‘आपण’ मुळातच बंधनरहित, कर्मशून्य, स्वयंप्रकाशित आणि ‘डागरहित’ (निर्दोष) आहोत. मनाचे व्यापार सुरू आहेत, तोपर्यंत बंध (अज्ञान) आहे. आपल्याला कसलेही नियम लागू नाहीत आणि ‘निश्चल’, ‘बदलरहित’ आणि ‘आकाररहित’ आहोत. सदैव ‘जागृत’ आणि ‘जाणीवसंपन्न.’ एवढेच नव्हे तर ‘जे काही आहे’ त्याचेही स्मरण किंवा आकांक्षा नाही. मग कसला ‘त्याग’ आणि कसली ‘उपासना?’ सगळे व्यामिश्र जग नाहीसे (नष्ट) झाले, की आपणही शांत, ‘स्व’स्थ झालोच. आणि हेच ‘अष्टावक्र गीते’चे सार आहे.

या ग्रंथात एकूण २० प्रकरणे आहेत, ती अशी -
१) साक्षी : सर्वसाक्षी आत्मा (श्लोक २०)
२) आश्चर्यम् : अनंत अशा ‘स्व’ची नवलाई (श्लोक २५)
३) आत्माद्वैत : पिंडी ते ब्रह्मांडी, ब्रह्मांडी ते पिंडी (श्लोक १४)
४) सर्वमात्मा : आत्म्याला जाणणारा आणि न जाणणारा (श्लोक ६)
५) लय : जाणीव लय पावतानाच्या पायऱ्या (श्लो‍क ४)
६) प्रकृते: पर: - आत्मलयाचे निरर्थकत्व (श्लो‍क ५)
७) शांत : आत्मा हा शांत आणि अथांग महासागर (श्लोक ४)
८) मोक्ष : बंध आणि मुक्ती (श्लोक ४)
९) निर्वेद : उदासीन (श्लोक ८)
१०) वैराग्य : विकाररहित (श्लोक ८)
११) चिद्रूप : आत्मा अर्थात शुद्ध आणि तेजस्वी ज्ञानभांडार (श्लोक ८)
१२) स्वभाव : चिंतनाची झेप (श्लोक ८)
१३) यथासुखम् : अलौकिक परमानंद (श्लो‍क ७)
१४) ईश्वर : मनाचा नैसर्गिक विलय (श्लोक ४)
१५) तत्त्वम् : अजन्मा ‘स्व’ किंवा ब्रह्म (श्लोक २०)
१६) स्वास्थ्य : जगाचा लोप आणि आत्मजाणीव (श्लोक ११)
१७) कैवल्य : आत्म्याचे आत्यंतिक एकटेपण (श्लोक २०)
१८) जीवन्मुक्ती : निर्विकल्प समाधीचे साधन आणि ध्येय (श्लोक १००)
१९) स्वमहिमा : आत्म्याचे ऐश्वर्य (श्लोक ८)
२०) अकिंचनभाव : तेज:पुंज (प्रकाशमान) आत्मा (श्लोक १४)
(एकूण श्लोक २९८)

‘जीवन्मुक्ती’ हे १८वे १०० श्लोकांचे प्रकरण महत्त्वाचे आहे. ते सारांश रूपाने पाहू.

ब्रह्म चैतन्यरूप, शांत आणि आनंदघन आहे, त्याला नमस्कार. ते आशा, भय आणि चिंताविरहित आहे. कर्म करणे बंधनकारक नाही. देहात आणि विश्वात एकच (परम) आत्मा व्याप्त आहे. ते नाम-गुण-आकाररहित असे शुद्ध तत्त्व आहे. तिथे भाव-अभाव, असणे- नसणे, क्रिया-अक्रिया हे काहीच संभवत नाही. ज्ञानी पुरुष शांत, निश्चल, बाधरहित, भेदातीत असतो. तो संकल्प आणि स्फुरणरहित असतो. हर्ष-खेदाचा स्पर्श नसल्याने परमशांती अनुभवतो. तो कर्मबंधनात कधी अडकत नाही. ‘अहं’ समाप्त झाल्याने तो केवळ ‘साक्षी असतो. पूर्ण वासनामुक्ती म्हणजेच मोक्ष अर्थात आत्मज्ञानसंपन्नता. ज्ञानी हा सदैव आनंदाने भरलेला असतो, निरपेक्ष असतो. त्याच्यातील ‘मी-तूपणाची बोळवण’ झालेली असते. ज्ञान आणि ज्ञानी एकच! अज्ञानाचा अभाव म्हणजे ज्ञान. तेच निर्गुणनिराकार परब्रह्म! ज्ञानाचे शब्दांत वर्णन करता येत नाही. ज्ञानी पुरुष जिथे, ज्या स्थितीत असेल तिथे नित्य (आत्म)तृप्त असतो आणि सर्वांभूती समत्व राखतो.

आत्मविषयक शाब्दिक ज्ञान हे खरे ज्ञान नव्हे. म्हणूनच रामदास स्वामी ‘मनाचे श्लोक’ सांगून झाल्यावर शेवटी म्हणतात -

मना गूज रे तूज हे प्राप्त झाले।
परी पाहिजे अंतरी यत्न केले॥
सदा श्रवणे पाविजे निश्चयासी।
धरी सज्जनसंगती धन्य होसी॥

- रवींद्र गुर्जर
संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

(‘अष्टावक्र गीता’ हे पुस्तक आणि ई-बुक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.)


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZXWCE
Similar Posts
महर्षी अरविंद यांचे अजरामर महाकाव्य - सावित्री महर्षी अरविंद (१५ ऑगस्ट १८७२ ते पाच डिसेंबर १९५०) यांना सारे जग एक श्रेष्ठ अध्यात्मिक गुरू म्हणून ओळखते. त्यांनी लिहिलेले सर्वांत प्रसिद्ध महाकाव्य म्हणजे ‘सावित्री’. सुमारे २४ हजार ओळींचे हे खंडकाव्य म्हणजे दिव्य आध्यात्मिक चिंतन आहे. अनेक वर्ष ‘सावित्री’चे इंग्रजीत लेखन सुरू होते. पुढे मराठीसह अनेक भाषांमध्ये त्याचे अनुवाद झाले
उपनिषदांचे अंतरंग वेद, उपनिषदे म्हणजे ज्ञानाचे प्राचीन भांडार आहे. यातील उपनिषदांचे अंतरंग उलगडून सांगत आहेत ज्येष्ठ लेखक, अनुवादक रवींद्र गुर्जर... त्यांच्या ‘किमया’ या सदरातून...
भारूड : नृत्यनाट्याद्वारे सोप्या शब्दांत अध्यात्माची शिकवण देणारा काव्यप्रकार महाराष्ट्रात सुमारे ८०० वर्षे भारूड हा काव्यप्रकार खूपच लोकप्रिय ठरला आहे. संत नामदेवांपासून मराठी भारुडे लिहिण्याची परंपरा सुरू झाली. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास यांनी ती पुढे चालवली. तथापि, भारूड म्हटले की संत एकनाथच समोर येतात. जनमानसात त्यांची भारुडे रूढ झालेली आहेत. वरकरणी ती समजायला
ब्रह्मविद्येचा सोपान - श्रीदत्तभार्गवसंवाद सर्व विद्यांमध्ये अध्यात्मविद्या श्रेष्ठ आहे. असा एक अद्भुत ग्रंथ उपलब्ध आहे, ज्यात गोष्टींद्वारे अध्यात्म साररूपाने प्रकट केलेले आहे. हारितायन ऋषींनी ‘त्रिपुरारहस्य’ या नावाने ‘माहात्म्य खंड’ आणि ‘ज्ञानखंड’ हे ग्रंथ लिहिलेले आहेत. त्यातील ज्ञानखंडात ‘श्रीदत्तभार्गवसंवाद’ हे प्रकरण येते. विषय समजण्यास

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language